प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत.
राज्यामध्ये विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणी करतांना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तसेच जिल्हा स्तरावरुन याविषयी नियमितपणे संनियंत्रण करण्यात येईल याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्वतः घ्यावयाची आहे.
१. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमधून मिष्ठान्न भोजन अथवा पदार्थ सर्व पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत.
२. शाळेच्या पहिल्या दिवसापासून योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या पाककृतीनुसार पोषण आहार उपलब्ध करुन देण्यात यावा. काही कारणामुळे आहार शिजविण्यास अडचणी असल्यास, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदरची अडचण त्वरीत दूर करुन संबंधित शाळेत आहार शिजविला जाईल याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.
३. जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून सर्व कार्यदिवसांमध्ये पोषण आहार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाईल याची दक्षता घ्यावी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे.
४. जिल्हा / तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी खालील लिंक वर भेट देऊन दररोज दुपारनंतर आपल्या जिल्हा/तालुक्यातील शाळांनी लाभ दिलेबाबत खात्री करावयाची आहे. काही शाळा माहिती भरण्याकरीता प्रलंबित असल्यास योजनेचा लाभ दिलेबाबत संबंधित शाळांची माहिती त्याच दिवशी एमडीएम पोर्टलवर नोंदविली जाईल याची दक्षता घ्यावयाची आहे.
https://pmposhan-ams.education.gov.in/School_Reported_today_total_view.aspx
५. वरील लिंक वर आपल्या तालुका तथा जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती आपणास पाहण्यास उपलब्ध आहे. दररोज जिल्ह्यातील योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी आहार दिलेबाबतची नोंद एमडीएम पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.
६. तालुका तथा जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करुन देखील एम.डी.एम पोर्टलवर माहितीची नोंद न केल्यास त्याकरीता संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्ह्याकरीता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना व्यक्तिशः जबाबदार समजण्यात येऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्राकरीता संबंधित प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग हे याकरीता जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावयाची आहे.
७. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांनी राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार देण्यात येऊन, दिलेल्या आहाराची नोंद एमडीएम पोर्टलवर त्याच दिवशी होईल याकरीता विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
८. शाळास्तरावर अथवा तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्वरीत त्याचे निराकरण जिल्हा कार्यालयाने करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन संबंधित अडचणींचे निराकरण शक्य नसल्यास त्वरीत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा.
९. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचे कामकाज सुरु होत असल्याने सर्व शाळांमधील स्वयंपायगृहे, भाडी, तांदुळ व धान्यादी माल स्वच्छ असल्याची खात्री करुन घेण्यात यावी. मुलांना आहार स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये उपलब्ध होईल याची दक्षता घेणेत यावी.
१०. केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना वरील नमूद सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश आपलेस्तरावरुन देण्यात यावेत.
११. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबाग निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आलेले आहे. याकरीता स्थानिक प्रगतीशील शेतकरी, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी तथा मदतनीस आणि शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची मदत घेण्यात यावी व शाळेमध्ये उत्कृष्ठ परसबाग विकसित होईल याचे नियोजन करण्यात यावे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी परसबाग निर्मितीबाबत प्रत्येक महिन्याला तालुक्यांकडून प्रगती अहवाल घेऊन संचालनालयास कळवावे.
१२. प्रत्येक तिमाही नंतर योजनेस पात्र सर्व मुलांच्या वजन व उंचीची नोंद नोंदवही मध्ये घेण्यात यावी. लवकरच सर्व शाळांना नोंदवह्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल याची नियोजन करण्यात यावे. जंतनाशक गोळ्या आणि आयर्न आणि फोलिक अॅसिड गोळ्यांचा लाभ आरोग्य विभागामार्फत योजनेस पात्र सर्व शाळांमधून दिला जाईल याकरीता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी आवश्यक तो संपर्क करण्यात यावा.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेच्या प्रत्येक दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगला, दर्जेदाज आहार उपलब्ध होईल याची आवश्यक ती दक्षता घ्यावी.
(देविदास कुलाळ)
राज्य समन्वय अधिकारी पीएम पोषण योजना
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, पुणे
सदरील आदेश PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.