राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2024 च्या बैठकीतील निर्णय

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
16 Min Read
\"\"

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*

👉  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता

✅  मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ

✅  डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

✅ यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील

✅ शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन

✅ सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

✅ नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष

✅ सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार.

मंत्रिमंडळ निर्णय सविस्तरपणे

दुग्ध विकासाला गती देणार; १४९ कोटीस मान्यता

• विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय. १४९ कोटी रुपये खर्चास मान्यता

• प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख. यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा असेल

• विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येणार

• या प्रकल्पात गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रूण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे, शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रम, संतुलित आहार आणि दर्जेदार चारा पुरवठा करणे, पशु आरोग्य सुविधा पुरविणे, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश

• ३ वर्षांच्या कालावधीत या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार

✅मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय; लाखो नागरिकांना लाभ

• मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

• या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार. ६० वर्षांपासूनची मागणी निकाली निघणार

• या अनुषंगाने हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदान अधिनियम १९५४ आणि हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५२ मध्ये सुधारणा करण्यात येणार

• मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात ४२ हजार ७१०.३१ हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिदमतमाश इनाम जमिनी (देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी). तसेच १३ हजार ८०३.१३ हेक्टर जमीन ही मदतमाश इनाम जमीन (केलेल्या कामगिरीसाठी इनाम दिलेल्या जमिनी) आहेत.

✅ डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

• डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

• या तीनही संस्था शासनाच्या अधिपत्याखालील अभिमत विद्यापीठे. त्यामुळे शासनाच्या अनुदानित महाविद्यालयांना लागू असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना त्यांना लागू करण्याचा निर्णय

✅ यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल

• यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल करण्याचा निर्णय

• २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त पंरतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी अशा यंत्रमागांना प्रती युनिट ७५ पैसे तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपया अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यात येईल.

✅ सेवानिवृत्त चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार प्राध्यापकांना ठोक मानधन

• शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांना करार पद्धतीने मानधन जास्तीत-जास्त प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध व्हावेत तसेच विद्यार्थी आणि रुग्णांना त्याचा लाभ व्हावा म्हणून एक विशेष बाब म्हणून सेवानिवृत्त अध्यापकांना एक ठोक रकमी मानधन देण्याचा निर्णय आता उर्वरित महाराष्ट्रासाठी प्राध्यापकांना १ लाख ८५ हजार आणि सहयोगी प्राध्यापकांना १ लाख ७० हजार तसेच दूरस्थ क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी प्राध्यापकांना २ लाख आणि सहयोगी प्राध्यापकांना १ लाख ८५ हजार मानधन देण्यात येईल

✅ सहा हजार कि.मी. रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण; सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता

• सुधारित हायब्रिड अॅन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार कि.मी. रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता.

• डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी खर्च अपेक्षित होता. या नव्या निर्णयामुळे सुधारित हायब्रिड अॅन्युईटी योजनेत शासनाच्या सहभागाच्या रकमेत २५८९ कोटी इतकी वाढ

• एकूण शासन सहभागाची रक्कम ११ हजार ८९ कोटीस मान्यता.

✅नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे

• राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय

• महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार

• राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय

✅सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफडब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

• राज्यातील ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफडब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय

• यवतमाळ, वाशिम तसेच चंद्रपूर जिल्ह्यांत या प्रकल्पांची उभारणी

या प्रकल्पांच्या खर्चापोटी १५६४ कोटी २२ लाख ऐवजी १४९४ कोटी ४६ लाख किंमतीच्या खर्चास मान्यता

• केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सुधारित वित्तीय पॅटर्ननुसार कर्जाचे प्रमाण प्रकल्प खर्चाच्या ८५ टक्के ऐवजी ७० टक्के ठेवण्यास मान्यता

• केएफ डब्ल्यू कंपनीचे १३० दशलक्ष युरो इतके कर्ज ०.०५ टक्के व्याज दराऐवजी २.८४ टक्के प्रती वर्ष या स्थिर व्याजदराने कमाल १२ वर्षात परतफेड करण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने\’मुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना – मुख्यमंत्री .



जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार

*महिला सक्षमीकरणाच्या विराट मेळाव्यात विविध शासकीय योजनांचे वितरण*

*धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई – भूमिपूजन*

जळगाव, दि. १३ ऑगस्ट, २०२४ – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे सुरु ठेवण्यात येतील,  असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’सह विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी करण्यात आले. धरणगाव येथे बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.

या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर” जळगावच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे.  संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे  हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना  सुरु होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन – प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यासाठी शासनस्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे, ही योजना यापुढेही कायम सुरूच राहणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात तरूणांना महिन्याला १० हजार मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही यांची ग्वाही ही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

*जळगाव जिल्ह्यात नार-पार प्रकल्पाचे पाणी आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

गिरणा नदीवरील नार-पार प्रकल्पासाठी राज्यपालांची मान्यता घेण्यात आली आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यात आणण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. पाडळसे व बोदवड सिंचन  प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही ही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

राज्यातील महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. यासाठी महिला सक्षमीकरणाचे काम राज्यात करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहे. यातून महिलांच्या संसाराला हातभार लागणार आहे. महिलांना एकदा दिलेले पैसे कधीच परत घेतले जाणार नाहीत. अशी १ कोटी ३५ लाख अर्ज पात्र आहेत. यातील ३५ लाख महिलांचे बॅंक खाते आधार लिंक बाकी आहेत. या महिलांचे खाते लिंक करून लवकरच त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात १५ लाख महिला लखपती दिदी करण्यात आलेल्या आहेत. या महिलांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ तारखेला जळगाव येथे आहेत. महिलांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. महिलांना एसटीतील ५० टक्के सवलतीमुळे एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. महिलांच्या हातात पैसे पडल्यामुळे ते त्याचा सदुपयोग करतात त्यामुळेच महिलांना बळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुलींकरिता शासनाने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे. महिला सक्षम झाल्यावर महाराष्ट्र देशात विकासाच्या पुढे जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

*जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार*

जळगाव जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देण्याचे काम शासन करणार आहे. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

गरीब, युवा, शेतकरी व महिलांसाठी हितकारक ठरणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  महाराष्ट्राचे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची चणचण नाही. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. राज्यातील विकासकामांवर परिणाम होऊ न देता ही योजना राबविण्यात येत आहे. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार आहे. या योजनेमुळे वर्षाला ४६ हजार कोटी खर्च होणार आहे. त्यातून बाजारात पैसा येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीजबिल सवलतीची बळीराजा योजना आणण्यात आली आहे.असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ५ लाख ९ हजार एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. यातून महिन्याला ८८ कोटी रूपये बहिणींना देण्यात येणार आहेत. मागील अडीच वर्षांत सर्वात जास्त योजना महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक निधी अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रभातसंघ, झेप महिला प्रभात संघ,स्त्री शक्ती महिला प्रभात संघ या महिला बचतगटांना प्रत्येकी 24 लाख 60 हजार रूपयांच्या अनुदानाच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

*लाभांचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण*

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे  प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. श्री समर्थ महिला बचत गट, अयोध्या नगर ( नागरी उपजिवीका मिशन अंतर्गत धनादेश वितरण ), तनिषा पोरवाल ५० लक्ष, शितल विसपुते २० लक्ष, अक्षिता पाटील १० लक्ष (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ धनादेश वितरण), माऊली महिला बचत गट, बिलवाडी, श्री.गणेश महिला बचतगट,बोरनार ( समुदाय गुंतवणूक निधी  प्रत्येकी ६ लाख धनादेश वितरण) दुर्गा महिला बचत गट,चिंचखेडे प्र., कालिंका माता महिला बचत गट,चिंचगट प्र.( मानव विकास मिशन अंतर्गत ई-रिक्षा ), शितल वानखेडे, रोहन देसले ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  नियुक्ती पत्र), आरती श्रीनाथ, सरला भिसे, निकीता पाटील, जागृती पाटील, पुजा श्रीनाथ ( पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्ती पत्र ) जनाबाई कोळी, धानोरा, मीराबाई कसोदे पाळधी खु., शांताबाई गरजे बाभळे, आशा तडवी, आडगाव यांना (राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गत शबरी व रमाई घरकुल आवास योजना ) धनश्री नेमाडे, देवाश्री पाटील यांना (कृषी विभागामार्फत ड्रोन वाटप ), देवांश्री पाटील या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचे महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कवयित्री बहिणाबाईंचा पुतळा व  बचतगटांच्या वस्तूंचा संच देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी, जळगाव जिल्ह्यातील बहिणींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेले भावनिक पत्र जिल्ह्यातील बहिंणींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दोन बहिणींच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी या पत्राची दृकश्राव्य चित्रफित ही दाखविण्यात आली. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा डॉ.अमोल शिंदे यांनी सादर केली. सूत्रसंचालन हर्षल पाटील आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *