भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ साजरा करणेबाबत शासन आदेश.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
8 Min Read

भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ साजरा करणेबाबत शासन आदेश.

\"\"

भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२४/प्र.क्र.१२५/राशि-१ राजशिष्टाचार शाखा, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : ०९ ऑगस्ट, २०२४

                        शासन परिपत्रक

       गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत :-

१) राज्यात सर्व विभागीय/जिल्हा/उप विभागीय/तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा.

२) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

३) राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

४) काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे ज्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील.

५) ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वा. च्या पूर्वी किंवा ९.३५ वा.च्या नंतर आयोजित करावा.

६) राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येवून राज्यगीत वाजविण्यात येईल.

७) याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा.

८) संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

९) समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

१०) दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय वाद- विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी / विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखादया विषयाचा Webinar आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

११) राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

१२) राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी- १०९१/३०, दिनांक २० मार्च, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९१ (२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि परिपत्रक क्रमांक एफएलजी १०९८/३४३/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

१३) स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

१४) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. विभागीय आयुक्त, कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मंत्रालय, मुंबई येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

१५) समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१६) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निदेश योग्य प्रकारे पाळण्यात येतील, याची व्यक्तीशः दक्षता घ्यावी.

१७) आचारसंहिता अंमलात असल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावीः-
अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळ व वेळेमध्ये बदल करण्यात येऊ नये.

ब) कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

क) मा. पालकमंत्री/इतर मान्यवर भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय कुठल्याही पद्धतीने राजकीय असता कामा नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


                                     (मिलिंद हरदास)

                                अवर सचिव, महाराष्ट्र शासन

साजरा करण्याबाबत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने \”हर घर तिरंगा\” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.


प्रति,
१. विभागीय शिक्षण व उपसंचालक, सर्व विभाग,
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर)
६. प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा) सर्व,
७. शिक्षणप्रमुख (मनपा)

विषय – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने \”हर घर तिरंगा\” या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.

संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि. ०६/०८/२०२४

२. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि. ०६/०८/२०२४

उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत \”हर घर तिरंगा\” या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावे, याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे.

तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा. सोबत – संदर्भीय पत्र व मार्गदर्शक सूचना

                         (डॉ. शोभा खंदारे)
         सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व
               प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

प्रत माहितीस्तव व सविनय सादर –

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२.मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे.
३. मा. संचालक (प्राथमिक/ माध्यमिक/ योजना)

सहसंचालक यांचे पत्र PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.

हर घर तिरंगा सेल्फी अपलोड करण्यासाठी खालील वेबसाईट वर क्लिक करा.

http://www.harghartiranga.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *