नवीन शैक्षणिक सत्र आता १ एप्रिलपासून.New Educatiinal Session start from 1 April.
नवीन शैक्षणिक सत्र आता १ एप्रिलपासून
👉 सुकाणू समितीची मंजुरी; सीबीएसईप्रमाणे राहणार अभ्यासक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येत असल्याने राज्य मंडळाशी संलग्नित शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनऐवजी १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांचा अभ्यास करून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात आल्याने यावरून अनेक वादविवाद झाले होते. या अभ्यासक्रम आराखड्यावर जवळपास तीन हजारांहून अधिक हरकती सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करून अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला अंतिम मान्यता देण्यात आली. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.
👉 अशी असतील पाठ्यपुस्तके
राज्य मंडळाच्या शाळांसाठी सीबीएसईचा बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी एनसीईआरटी, सीबीएसई यांच्याकडील पाठ्यपुस्तके इंग्रजी आणि हिंदी माध्यमांत उपलब्ध आहेत. अन्य माध्यमांसाठी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती पाठ्यपुस्तके आवश्यक माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे सोपवण्यात आली. इतिहास, भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तके स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, जागतिक अशा आशयाचे करण्यात येणार आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके राज्यातच तयार करण्याचे ठरले आहे.
👉 अशा असणार सुट्या
महाराष्ट्रात राज्य मंडळाच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होते. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. मात्र, आता सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात होईल. १ ते ३१ मे उन्हाळ्याच्या सुट्या राहतील. त्यानंतर पुन्हा १ जूनपासून शाळा सुरू होऊन मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतील.
👉 अभ्यासक म्हणतात…
■ शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक डॉ रूपेश चिंतामणराव मोरे यांनी सांगितले, ‘राज्य मंडळाच्या शाळांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावी बोर्ड परीक्षा असतात. एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा झाल्या की, १ मे ते १५ जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्या असतात. १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होते. प्रवेश नोंदणी, नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदी त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाला जुलै उजाडतो. या उलट सीबीएसई शाळांचा मार्चमध्ये निकाल लागून १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होते. एप्रिलमध्येच पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्यांची खरेदी झाल्याने मुलांना नव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष ओळख होईल. मे महिन्याच्या दोर्ष सुटीत मुले वाटेल तेव्हा पुस्तके वाचू शकतील. त्यामुळे त्यांना स्वयम् अध्ययनाची सवय लागेल. राज्य मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सीबीएसई शाळांप्रमाणे करणे हे शैक्षणिकदृष्ट्या। उपयुक्त ठरेल.’