रमाबाई भीमराव आंबेडकर

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read
\"\"

रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.

सुरुवातीचे जीवन:-

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.

विवाह :-
सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.

कष्टमय जीवन :-
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.
त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.
ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.

बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी :-

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, \”साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.\” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.

रमाबाई ते रमाआई :-

एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.
वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना \”रमाआई\” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.

ख्यातनाम गायक \”मिलिंद शिंदे\” म्हणतात,
\”भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |\”

निर्वाण :-

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरून गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.

थॉट्स ऑन पाकीस्तान :-

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

रमाईंवरील पुस्तके :-

रमाई – यशवंत मनोहर
त्यागवंती रमामाऊली – नाना ढाकुलकर, विजय प्रकाशन (नागपूर), ४०३ पृष्ठे
प्रिय रामू – योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- २३०
\”हिमालयाची सावली माता रमाई\” ‎– बाबूराव वाघ

शैक्षणिक संस्था :-

मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद
रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली
माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (स्थापना १९९०)

चित्रपट :-

रमाई : हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईंच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत.
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
रमाबाई (चित्रपट)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *