स्वीयेतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत द्यावयाचे मासिक निवृत्तिवेतन अंशदान / रजा वेतन अंशदान.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
वाचा : १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : पीईएन-१०८२/प्र.क्र.१४३४/ एसईआर-८, दिनांक ०१ ऑक्टोबर, १९८३
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : स्वीयेसे- १०८९/प्र.क्र.२६२/सेवा-२, दिनांक ८ मे, १९९०
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : स्वीयेसे- २००९/प्र.क्र.४७/सेवा-६, दिनांक २५ जानेवारी, २०१०
४) शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर २०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९.
शासन निर्णय :-
शासकीय कर्मचारी क्रियाशील स्वीयेतर सेवेत असताना त्यासंबंधात द्याव्या लागणाऱ्या निवृत्तिवेतनाच्या अंशदानाचे दर व रजा वेतनाचे अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या परिशिष्ट – चारच्या नियम ६ मधील पोटनियम (१) व (२) मधील तक्त्यात विहित करण्यात आले आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर २०१९/प्र.क्र.१/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये दिनांक ०१ जानेवारी, २०१६ पासून सुधारित करण्यात आल्या आहेत. या वस्तुस्थितीमुळे व त्यानंतर इतर अनेक बदल घडून आल्याने क्रियाशील स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या त्या कालावधीसाठी द्याव्या लागणाऱ्या निवृत्तिवेतनाच्या व रजा वेतनाच्या मासिक अंशदानाच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता.
२. शासनाने आता याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत :-
(१) क्रियाशील स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबत मासिक रजा वेतन अंशदान व निवृत्तिवेतन अंशदानाच्या परिगणनेसाठी “ वेतन ” या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ मधील नियम ३ (१२) मध्ये दिलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील.
(२) शासकीय कर्मचाऱ्यांचे क्रियाशील स्वीयेतर सेवेच्या कालखंडात देय होणारे निवृत्तिवेतनाचे अंशदान, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या परिशिष्ट- चार मधील नियम ६ च्या पोटनियम ( १ ) मध्ये प्रस्तावनेतील शासन निर्णय, दिनांक ०१.१०.१९८३ अन्वये विहित केलेल्या तक्त्यात नमूद केलेल्या दराने,कर्मचारी स्वीयेतर सेवेत जाताना तो धारण करीत असलेल्या पदाचे सध्याचे सुधारित वेतनश्रेणीतील वेतन अथवा स्वीयेतर सेवेत असताना त्याला एखाद्या पदावर “प्रपत्र पदोन्नती” देण्यात आली असेल तर त्या पदाच्या सुधारित वेतनश्रेणीत निश्चित करण्यात येणारे वेतन लक्षात घेऊन, त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच परिगणित करण्यात यावे.
(३) क्रियाशील स्वीयेतर सेवेमध्ये असताना रजा वेतनापोटी द्यावयाच्या मासिक अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या परिशिष्ट- चार मधील नियम ६ च्या पोटनियम (२) मध्ये विहित केल्यानुसार स्वीयेतर सेवेमध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या ११% (अकरा टक्के) इतके राहील.
३. सदर आदेश सुधारित वेतनश्रेणी अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक ०१ जानेवारी, २०१६ पासून अंमलात येतील. मात्र प्रतिनियुक्तीवरील ज्या कर्मचाऱ्यांनी तसा विकल्प देऊन दिनांक ०१ जानेवारी, २०१६ नंतरही असुधारित वेतनश्रेणीतच वेतन घेणे चालू ठेवले असेल त्यांच्या बाबतीत, सदर आदेश त्यांच्या विकल्पानुसार त्यांनी ज्या दिनांकापासून सुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणे सुरु केले असेल, त्या दिनांकापासून अंमलात येतील. तसेच दिनांक ०१ जानेवारी, २०१६ पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते व ज्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दिनांक ०१ जानेवारी, २०१६ च्या पुढेही चालू राहिला/वाढविण्यात आलेला असेल, तसेच ज्यांना यापुढे प्रतिनियुक्तीवर पाठविले जाईल, त्या सर्वांच्या बाबतीत हे आदेश लागू राहतील.
४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४०२२२१५०५२०११०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
( वि. अ. धोत्रे )
उप सचिव, महाराष्ट्र शासन.
सदरील शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.